Saturday, May 24, 2014

ध्येय

●● ध्येयपुर्तीसाठी आवश्यक बाबी ●●
( व्यक्तिनुरुप या बाबी वेगळ्या असु शकतात )

* ध्येयाची गरज
* ध्येयाची निश्चिती
* नियोजन
* अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न
* अडथळ्यांवर मात
* आत्मविश्वास

●● ध्येयाची गरज का आहे ? ●●

मित्रांनो,खरंतर माणसाला त्याच्या आयुष्यात कोणतं ना कोणतं तरी ध्येय हे असावंच लागतं.ज्या माणसाकडे कोणतेच ध्येय नाही त्याचे जीवन अर्थहीन म्हणावे लागेल.
कारण ध्येयहीन जीवन म्हणजे दिशाहीन प्रवासच...! ज्याचा शेवट कधी,कुठे अन् कसा होईल हे कुणीच सांगु शकत नाही.
दिशाहीन नाव ज्याप्रमाणे समुद्रात भरकटते तशाच पध्दतीने ध्येयहीन माणुस त्याच्या आयुष्यात भरकटुन जातो.
ज्यांच्या आयुष्यात निश्चित असे ध्येय असते त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

त्यासाठी आपल्याला जीवनात काय करायचंय ते निश्चित करा,ध्येय ठरवा आणि प्रथम प्राधान्य आपल्या करीयरला द्या.

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी आपले स्वराज्य स्थापनेचे ध्येय ठरवले आणि प्रयत्न करुन ते मिळवले.म्हणुनच शिवरायांची किर्ती आज जगभर गायली जाते.

जे ध्येय मिळवल्याने तुमच्या पुढील आयुष्यात फायदा होणार असेल आणि यात कोणतेही दुमत नसेल तर असे ध्येय मिळवण्यासाठी दृढ निश्चयाने प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
नाहीतर आज तुम्ही जे करत आहात तेच भविष्यात करत राहीलात तर भविष्यातही तुम्हाला तेच मिळत राहील जे आज तुम्हाला मिळत आहे.
तुम्हाला वेगळे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला वेगळे काहीतरी करावे लागेल.
त्यासाठी आपले ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयाच्या पुर्तीसाठी आवश्यक प्रयत्न करणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे.

●● ध्येयाची निश्चिती ●●

केवळ एक धाडसी निर्णयच तुमचे सगळे आयुष्यच बदलुन टाकु शकतो.त्यासाठी निर्णय घ्या.ध्येय ठरवा.
ध्येय ठरवणे हेच अर्धे ध्येय मिळवण्यासारखे आहे.स्वतःची क्षमता ओळखुन आणि पाठीमागच्या अनुभवांवरुन आपले ध्येय ठरवता येईल.
ध्येय ठरवत असताना ते ध्येय SMART असावे.
S - Specific -आपले ध्येय निश्चि व ठराविक असावे.
M - Measurable -आपले ध्येय आवाक्यातले परंतु आव्हानात्मक असावे.
A - Achievable -आपले ध्येय साध्य होण्याजोगे वास्तव व योग्य असावे.
R - Reviewable -आपल्या ध्येयाचे प्रत्येक टप्प्यावर अवलोकन करता आले पाहिजे.
T - Time Bounded -आपल्या ध्येयाला वेळेचे निश्चित बंधन असावे.

वेळ-काळानुसार आपल्या ध्येयात आपल्याला थोडेफार बदल करताही आले पाहीजेत,याप्रमाणात ते लवचिकही असावे.

●● नियोजन ●●

एकदा का निश्चित ध्येय ठरवले की मग ते ध्येय पुर्ण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींची तयारी करता येईल.नियोजन हा ध्येयपुर्तीसाठीचा खुप महत्वाचा भाग आहे.ध्येयाचे वेळेशी सुसंगत नियोजन असेल तर निम्मे काम सोपे होते.ध्येयपुर्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन त्यानुसार वाटचाल केली तर सुरळीतपणे ध्येयापर्यंत पोचण्यात काहीच अडचण येत नाही.

●● अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न ●●

असाध्य ते साध्य | करिता सायास |
कारण अभ्यास | तुका म्हणे ||

कोणतीही गोष्ट केवळ अभ्यासानेच शक्य होते.
ज्याप्रमाणे शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते,त्याप्रमाणेच आधीच कष्ट घेतले असता परत जास्त धावाधाव करावी लागणार नाही.
आपले ध्येय मिळवायचे असतील तर अभ्यासाशिवाय शक्य नाही.ध्येयाची तीव्र गरज ही अभ्यासाची पहीली पायरी आहे. ध्येय उराशी बाळगुन ध्येयाने झपाटुन काम केले तर ध्येय प्राप्त होते,कारण संधी ही खेचुनच आणावी लागते.आपल्याला ध्येयावर इतर इतके लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे की किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करता येईल.
यशावर नजर ठेवण्यापेक्षा आपल्या प्रयत्नांवर नजर ठेवा,कारण प्रयत्नाने सर्व गोष्टी मिळवता येतात.ध्येयाचा पाठपुरावा केला तरच ध्येय मिळेल.
ध्येयाची चाहुल लागल्यावर संघर्ष चालु होतो आणि ध्येयाच्या ध्यासाने श्रमाचा त्रास कमी होतो.म्हणुन एकाग्र मनाने ध्येयाकडे वाटचाल केल्यास ध्येय लवकर गाठता येते.
पायाने चालणारे फक्त अंतर कापतात पण डोक्याने चालणारे ध्येयापर्यंत पोचतात.

●● अडथळ्यांवर मात ●●

ही खुप महत्वाची बाब आहे.आपल्या ध्येयामधे अनेक अडथळे येतात.काही आपण निर्माण करतो तर काही ध्येयाशी निगडित असतात.
ध्येयपुर्तीमधे खुप नुकसान होत असेल तर घेतलेला निर्णय बदलण्याचा तुम्हाला निश्चितच अधिकार आहे.
त्यासाठी एक काम करा.
आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवा.हे ध्येय मिळवताना कोणत्या अडचणी आपण स्वतःहुन निर्माण केल्या आहेत आणि कोणत्या ध्येयाशी निगडीत आहेत याची यादी करा.आपण स्वतःहुन निर्माण केलेल्या अडचणी अगदी कठोर मनाने दुर करा.ध्येयापासुन विचलित करणाऱ्या गोष्टींपासुन अंग काढुन घ्या.सद्य परीस्थिती मान्य करुन त्यात काय सुधारणा करु शकतो हा विचार करुन कामाला लागा.
राहीला प्रश्न इतर अडचणींचा तर प्रयत्नाने प्रत्येक गोष्टीवर मात करता येते हेच लक्षात ठेवा.चिकाटी सोडु नका.

●● आत्मविश्वास ●●

आत्मविश्वास हा आपल्या प्रत्येकाजवळ असतो.तो जागृत होण्यासाठी त्याला चुचकारावं लागतं.तो निर्माण होण्यासाठी कुणीतरी प्रोत्साहन द्यावे लागतं आणि एकदा जर हा निर्माण झाला तर प्रचंड अशी कार्य घडवुन आणतो.
मनाचे खच्चीकरण करणाऱ्या, न्युनगंड वाढवणाऱ्या विचारांना दुर सारुन आपण जेव्हा जीवनातली सकारात्मक,प्रकाशमान बाजु पहायला शिकतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो.यासाठी शारीरिक व्यायाम,योगा सारखे उपक्रम अमलात आणा.
जगात काहीच अशक्य नाही,फक्त आपण ते मनावर घेत नाही इतकेच.
शेवटी आत्मविश्वासानेच ध्येयाला गवसणी घालता येईल.त्यासाठी स्वतःवर पुर्ण विश्वास ठेऊन ध्येयाकडे वाटचाल करा.यश तुमचेच आहे.

●● काही Motivational वाक्य ●●

* तुम्ही ध्येयाकडे चालत गेला तर ध्येय तुमच्याकडे धावत येते.
-स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर छत्रपती शंभुराजे

* आपण काय करणार आहोत ते एकदा निश्चित करा.ती गोष्ट आपण करणारच हे निश्चित करुन टाका.ती गोष्ट करण्यासाठीचे मार्ग शोधण्याच्या मागे लागा.
-अब्राहम लिंकन

* तुम्ही जे स्वप्न पाहीलंय,जी गोष्ट तुम्ही करु शकता त्याची सुरुवात लगेच करा.धाडसामधे जादु आहे, ताकत आहे आणि सर्जनशिलतादेखील आहे. सुरुवात करा.
-गोशे.

* आकाश त्यांच्यासाठीच छोटं आहे
जे त्याहूनही ऊंचीची स्वप्ने बघतात..
हे जग त्यांच्यासाठीच खोटं आहे
जे एखाद्या ध्येयाशिवाय जीवन जगतात..

|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ||

-अनिल माने